![jammu-kashmir-security](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/05/jammu-kashmir-security-696x447.jpg)
जम्मू – कश्मीर आज आयईडी स्फोटाने अक्षरशः हादरले. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात कॅप्टनसह जवान शहीद झाला तर एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेनंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
जम्मूत गेल्या चार दिवसात आयईडी स्फोटाची तिसरी घटना घडली आहे. लष्कराचे जवान गस्त घालत असताना हा स्फोट झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू येथील लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्पोरेशन विभागाला लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी राजौरी जिह्यात नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली दिसत असल्याचे आणि तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला आणि दोन जवानांना प्राण गमवावे लागले.
नेमके काय घडले?
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराची तुकडी गस्त घालत असताना जम्मू जिल्ह्यातील अखनूरच्या भत्तल परिसरातील चौकीनजीक दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या अतिशय शक्तीशाली आयईडी स्फोटकांचा स्फोट झाला. कॅप्टनसह जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कॅप्टनसह दोन जवानांचा मृत्यू झाला. तर एका जवानावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी 14 जानेवारी रोजी जम्मू आणि कश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरूंग स्फोटात गोरखा रायफल्सचे सहा जवान जखमी झाले होते.
2024 मध्येही घडल्या स्फोटाच्या घटना
9 डिसेंबर 2024 रोजी जम्मूतील पूँछ येथे स्फोट झाला. यात एक सैनिक जखमी झाला. पूँछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना भुसुरूंगाच्या स्फोटात हवालदार व्ही सुब्बैय्या वारीकुंता शहीद झाले.
ऑक्टोबर 2024 मध्ये कुपवाडा येथे एका खाणीत स्फोट झाला होता. यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण रेषेवर जवान गस्त घालत असताना हा स्फोट झाला.
दोन दिवसांपासून फायरिंग
राजौरी जिह्यातील नौशेरा सेक्टर येथील कलाल परिसरात दहशतवाद्यांनी सोमवारी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. त्याआधी 8 फेब्रुवारी रोजी लष्कराचे जवान गस्त घालत असताना राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता.