दोन बहिणी एकाच वेळी यूपीएससी पास

कोणत्याही परीक्षेत यश मिळवता आले नाही म्हणजे आयुष्य संपत नाही. आपण जे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे, त्यासाठी मनापासून मेहनत करण्याची धमक आपल्यात हवी. दररोज नियमित अभ्यास केल्यास यश हमखास मिळेल, असे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या दोन सख्ख्या बहिणींनी म्हटलेय. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिह्यातील अजयपूर गावातील सौम्या आणि सुमेघा या दोन सख्ख्या बहिणी एकाच वेळी आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सौम्या मिश्राने चौथ्या प्रयत्नात 18 वी रँक मिळवली आहे, तर सुमेघा मिश्रा हिने दुसऱया प्रयत्नात 253 वी रँक मिळवली आहे. सौम्या मिश्रा ही सध्या मिर्झापूरमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत आहे. वडील राघवेंद्र मिश्रा हे एका सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलीला लहानपणापासून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवले होते.

सरकारी शाळेत शिकून अधिकारी होता येते
सध्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे सरकारी शाळेकडे विद्यार्थी कमी प्रमाणात जात असतात, परंतु सरकारी शाळेत शिकूनही आयएएस अधिकारी होता येते, हे या दोन्ही बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे.