
नांदेडच्या शहिदपूरा भागात 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी शुटर जगदीशसिंह उर्फ जग्गा रा.तरणतारण यास पंजाब पोलिसाच्या पथकाने अटक केली आहे. त्याला हस्तांतरण वॉरंटवरुन नांदेडला लवकरच आणण्यात येणार असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाकडून सांगण्यात आले. त्याच्याकडून पिस्तूल देखील जप्त करण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील शहिदपूरा भागात गेट क्र.6 वर 10 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पॅरोलवर सुटलेल्या आरोपी व त्याच्या मित्रावर गोळीबार करण्यात आला होता. बब्बर खालसाचा कुख्यात आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंधा याचा भाऊ सत्या याचा खुन केल्याप्रकरणी गुरमितसिंघ सेवादार याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो पॅरोलवर सुटल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र त्यात गुरमितसिंघ सेवादार हा जखमी झाला. मात्र त्याच्यासोबत असलेला रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड हा गोळीबारात मृत्यूमुखी पडला. त्यानंतर गोळीबार करणारा आरोपी दुचाकीवरुन फरार झाला. याबाबतचा तपास नांदेड पोलीस करत असताना नांदेड पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी हा फरार झाला होता.
याबाबतचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या टिम तैनात करण्यात आल्या होत्या. वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती नांदेड पोलिसांनी एटीएस व पंजाब पोलिसांना दिली होती. त्यानुसार पंजाब पोलिसांच्या पथकाने शोध मोहिम सुरु केली. पंजाब पोलिसांनी याबाबत टार्गेट क्लिंगसाठी आलेल्या शुटर जगदीशसिंह उर्फ जग्गा रा.तरणतारण तसेच शुभदिपसिंघ उर्फ शुभ औलक रा.तरणतारण यांना संशयास्पदरित्या फिरताना पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले. त्यातील शुटर जगदीशसिंह उर्फ जग्गा रा.तरणतारण याने गुरुव्दारा परिसरात गोळीबार केल्याचे कबूल केले. त्याचे मुख्य टार्गेट पॅरोलवर सुटलेला व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुरमितसिंघ सेवादार होते. मात्र गुरमितसिंघचा मित्र रविंद्रसिंघ राठोड हा त्यात मृत्यूमुखी पडला. सध्या गुरमितसिंघ सेवादार शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. शुटर जग्गाने दहा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर अत्यंत चपळाईने तो पळून गेला होता. अखेर त्यास काल अटक करण्यात आली असून, त्याला नांदेडमध्ये हस्तांतरण वॉरंटवर आणण्यासाठी नांदेड एटीएसची टिम पंजाबमध्ये पोहंचल्याचे पोलिसांनी सांगितले.