पुण्यानंतर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस पथकाने सोलापूर जिल्ह्यात कारवाई करीत पाच लाख रुपयांची लाच घेणारे मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश रामचंद्र घायाळ यांना अटक केली आहे. आठ दिवसांपूर्वी पुण्याच्या पथकाने 50 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी माळशिरस येथील कनिष्ठ अभियंता शशिकांत सयाजी चौगुले याला अटक केली. गेल्या आठ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार कारवाया केल्या आहेत.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रादाराविरुद्ध अर्ज करण्यात आले आहेत. या तक्रार अर्जाच्या चौकशीदरम्यान दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून तक्रादाराचे नाव कमी करणे व तक्रारदार यांच्या नातेवाईकांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्याचे आमिष दाखवून पोलीस रायप्पा कोळी, पोलीस शिपाई वैभव हवालदार महेश रायप्पा कोळी (रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) व पोलीस शिपाई वैभव रामचंद्र घायाळ (रा. गोपाळपूर, शिवाजीनगर, पंढरपूर) यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
या लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता पाच लाख रुपये घेताना पोलीस हवालदार कोळी व पोलीस शिपाई घायाळ यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे, सांगली व सोलापूरच्या पथकांनी गेल्या आठवडाभरात विभागात चार कारवाई करून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभाग, महापालिका, महसूल आणि पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश आहे.