भरसमुद्रात एम. व्ही. मारथोमा या मासेमारी बोटीवरील तांडेलच्या आगाऊपणामुळे मोठी दुर्घटना घडली. बोट हयगयीने व बेदरकारपणे सुसाट चालवत त्याने नौदलाच्या आय.एन.एस. करंज या पाणबुडीला धडक दिली. या धडकेत पाणबुडीचे दहा कोटींचे नुकसान झाले, तर मासेमारी बोटीवरील दोघा खलाशांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात तांडेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अरबी समुद्रात पाणबुडी आणि मासेमारी बोटीची धडक झाली. एम. व्ही. मारथोमा या मासेमारी बोटीवरील तांडेलने अचानक आय.एन.एस. करंज या पाणबुडीपेक्षा अधिक वेग वाढविला. ही बाब लक्षात येताच आय.एन.एस. करंज पाणबुडीवरील चालकाने सुरक्षिततेची काळजी घेत मारथोमा या मासेमारी बोटीस धडक बसू नये याकरिता पाणबुडीचा वेग वाढविला व त्यांनी दिशा बदलली. शिवाय मासेमारी बोट एम. व्ही. मारथोमा याच्याकडे पाणबुडी जाऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेत डावीकडे वळण घेतले. मात्र पाणबुडीचा वेग वाढल्याचे पाहून एफ. व्ही. मारथोमा बोटीवरील तांडेलनेदेखील बोटीचा वेग वाढवला. परिणामी बोट आय.एन.एस. करंज पाणबुडीला जाऊन धडकली.
बोट पलटी होऊन समुद्राच्या तळाशी गेली. बोटीवरील 13 खलाशी हे समुद्रात बुडू लागले. त्यातील 11 जणांना वाचविण्यात यश आले. दोन खलाशांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत आय.एन.एस. करंज या पाणबुडी बोटीचे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेला एम. व्ही. मारथोमा बोटीचा तांडेल जबाबदार असल्याने त्याच्याविरोधात नौदलाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.