जळगाव जिह्यातील भुसावळ शहरांमध्ये मरीमाता मंदिराजवळ बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात कारमध्ये बसलेले माजी नगरसेवक संतोष बारसे (48) व सुनील राखुंडे (45) या दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या शरीरावर 12 राऊंड फायर केले गेले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 11 जणांवर आज भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे जळगाव रोडवरील मरीमाता मंदिराकडून कारने येत होते. यावेळी जळगाव रोडवर हल्लेखोरांनी कारवर अंदाधुंद गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. बारसे व राखुंडे यांना तत्काळ हॉस्पिटलला नेले, पण उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.