जालन्यात लाच घेताना दोघांना पकडले

तक्रारदार यांचे फेर दुरुस्तीबाबत आदेश काढून देण्यासाठी तहसीलदार, जालना व पेशकार शिंदे यांच्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना इंदेवाडी सजाचे तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार यांना अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज १९ डिसेंबर रोजी सोरटीनगर, अंबड चौफुली येथील तलाठ्याच्या खासगी कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदार यांनी इसार पावतीद्वारे घेतलेल्या जमिनींची त्यांना खरेदी करणे असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी तक्रारदार तलाठी शिवदास पवार यांना भेटले असता त्यांनी फेरदरुस्ती करण्यासाठी तहसीलदार जालना यांचा आदेश काढावा लागेल. त्यासाठी तहसीलदार आणि पेशकार शिंदे यांना २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराची तलाठ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरो, जालना यांच्याकडे तक्रार केली.

तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी तक्रारदार व तलाठी यांची लाच मागणीबाबत पडताळणी केली. तलाठी पवार याने तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार आणि पेशकार शिंदे यांच्याकरिता पंचासमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. आज 19 डिसेंबर रोजी सापळा लावला असता तक्रारदार यांचा फेर दरुस्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यांना त्यांच्या खासगी कार्यालय, सोरटीनगर अंबड चौफुलीजवळ जि. जालना येथे लाचेच्या रकमेसह अॅन्टी करप्शन ब्युरो, जालनाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ही कामगिरी अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर व पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके गणेश बजाडे कष्णा देठे यांनी केली.