टिपेश्वर अभयारण्यातील आणखी दोन वाघ बेपत्ता, राज्यात दहा दिवसांत पाच वाघांची हत्या

राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना मागील दहा दिवसांत दहा वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातच यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून दोन वाघ बेपत्ता झाले आहेत. ‘तलाववाली’ ही वाघीण आणि ‘जंजीर’ हा वाघ मागील काही दिवसांपासून नजरेस पडलेले नाहीत. यामुळे वन्य जीव संवर्धकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पावसाळय़ात अभयारण्य पर्यटनासाठी बंद होण्यापूर्वी या दोन्ही वाघांची हालचाल होती. पावसाळय़ानंतर पर्यटनाचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्यापासून या वाघांचा कोणताही ठावठिकाणा नाही. टिपेश्वर अभयारण्यातून याआधी ‘स्टार’ हा वाघ आणि ‘पिलखान’ ही वाघीण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही. आता पुन्हा एकदा दोन वाघ गायब होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

टिपेश्वर अभयारण्यातून याआधी जेव्हा ‘स्टार’ हा वाघ बेपत्ता झाला तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, मात्र वन विभागाला यश मिळाले नाही. यावेळी तसे प्रयत्न होत नसल्याचे वन्यजीवप्रेमी आणि संवर्धकाचे म्हणणे आहे. ‘तलाववाली’ आणि ‘जंजीर’ यांच्या शोधासाठी त्वरित कारवाई करण्याचे यावी. तसेच पॅमेरा ट्रप बसवणे, तज्ञ ट्रकर्सची मदत घेऊन शोधमोहीम राबवावी, असे आवाहन वन्यजीव संवर्धनतज्ञांनी वन विभागाला केले आहे.

या अभयारण्यातून आजतागायत अनेक वाघांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. त्यामुळे या वाघांनीसुद्धा इतरत्र स्थलांतर तर केले नाही ना, अशीही एक शंका व्यक्त केली जात आहे. कारण या काळात वाघ इतरत्र स्थलांतर करतात, असे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले यांनी सांगितले.

वाघांचे मृत्यू, केव्हा व कुठे?

  • 2 जानेवारी – चंद्रपूर सिंदेवाही वन परिक्षेत्रात शेतातील नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला.
  • 6 जानेवारी – भंडारा-तुमसर वन परिक्षेत्राअंतर्गत घनदाट जंगलात वाघाचा मृतदेह आढळला.
  • 7 जानेवारी – यवतमाळ वणी तालुक्यातील उकणी येथील कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
  • 8 जानेवारी – नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पालगत वाघिणीच्या बछडय़ाचा मृतदेह आढळला.
  • 9 जानेवारी – चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळला.