शौचालयासाठी फक्त दोन मिनिटे, चीनमधील कंपनीच्या नव्या नियमाने कर्मचारी हादरले

कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्याला शौचालयाला जायचे असेल तर केवळ दोन मिनिटे मिळतील, असा अजब नियम चीनमधील एका कंपनीने काढला. कंपनीच्या या नव्या नियमांमुळे कर्मचारी हादरले असून त्यांनी कंपनीच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. गरज असल्यास ते शौचालयात जाऊ शकतात. मात्र त्यांना फक्त दोन मिनिटांपर्यंत वेळ मिळेल. कंपनीने सकाळी आणि दुपारी काही विशिष्ट वेळी शौचालय वापरण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यात ओव्हरटाइम शिफ्टचाही समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट शारीरिक समस्यांमुळे वारंवार शौचालयास जावे लागते ते यासाठी परवानगी घेऊ शकतात. तथापि, या कालावधीत घालवलेल्या वेळेसाठी त्यांचा पगार कापला जाईल, असे कंपनीने म्हटले. हा नियम कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण करून कामगार कायद्यांचे उल्लंघन करतो. कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, कामाचे तास, विश्रांतीचा कालावधी, सुट्टय़ा, सुरक्षा प्रोटोकॉलमधील कोणतेही बदल सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून परस्पर सहमती सुनिश्चित करावी, असे मत वकिलांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे वाद वाढत असल्याने कंपनीने हा निर्णय मागे घेतला.

कंपनीचा अजब युक्तिवाद

आपण जो नियम काढला आहे, तो योग्य आहे, असे सांगत कंपनीने असा युक्तिवाद आहे की, हे धोरण प्राचीन चिनी वैद्यकीय शास्त्राशी सुसंगत आहे आणि या नियमाचा उद्देश सुव्यवस्था राखणे, कार्यक्षमता वाढवणे व कामाच्या ठिकाणाचा दृष्टिकोन सुधारण्याचा असल्याचे कंपनीने सांगितले. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी, सकाळी 10.30 ते 10.40, दुपारी 12 ते 1.30, दुपारी 3.30 ते 3.40 आणि सायंकाळी 5.30 ते 6 वाजेपर्यंत शौचालय वापरण्याची परवानगी आहे. ओव्हरटाइम शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री 9 नंतर परवानगी देण्यात आली, असे कंपनीने म्हटले.