दारूचा ओव्हर डोस, फास्टफूड आणि बदलेली आहारशैली यामुळे देशवासीयांचे यकृत (लिव्हर) अडचणीत आले आहे. २०१५ मध्ये जगात लिव्हरच्या विकाराने 20 लाख लोकांचा बळी घेतला होता. त्यामध्ये हिंदुस्थानमधील 6 लाख रुग्णांचा समावेश होता. देशात प्रत्येक वर्षी यकृताच्या विकाराचे 2 लाख नवे रुग्ण आढळून येत असून त्यामध्ये 25 हजार रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज भासत आहे. ही धक्कादायक बाब वैद्यकीय सर्वेक्षणात पुढे आली आहे.
देशात लिव्हरच्या विकाराच्या रुग्णांची संख्या विजेच्या वेगाने वाढू लागल्यानंतर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात 12 बेड्सचे लिव्हर इंटेन्सिव्ह केयर युनिट सुरू करण्यात आले आहे. या युनिटमध्ये अॅक्यूट लिव्हर फेल्युअर, जुनाट आजारांवर उपचार आणि ट्रान्सप्लाण्ट रिकव्हरीसाठी सर्वसमावेशक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या युनिटचे उद्घाटन आज झाले. त्यामुळे लिव्हर तज्ज्ञांनी सांगितले की, हिंदुस्थानमध्ये यकृताचे आजार ही खूप मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. क्रोनिक लिव्हर आजार हा खूप जास्त मद्यपान, व्हायरल हेपेटायटिस, नॉन-अल्कहोल फॅटी लिव्हर आणि आनुवंशिक आजारांमुळे होतो. हिंदुस्थानमध्ये ४० मिलियनपेक्षा जास्त लोकांना हेपेटायटिस बीचा संसर्ग झालेला आहे आणि दरवर्षी जवळपास ६ लाख लोक यामुळेच आपला जीव गमवतात. बहुतांश लोकांना आपल्याला संसर्ग झाला आहे हेच माहिती नसते. वेळेत उपचार घेतले तर आपल्याला लिव्हर वाचवता येऊ शकते, असे अपोलो रुग्णालयाचे गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपेटोलॉजी कन्सल्टण्ट डॉ. अमेय सोनावणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
लिव्हरचे काम मशीनला करता येत नाही
यकृताच्या आजाराचे ओझे वाढत असल्यामुळे विशेष देखभाल खूप गरजेची आहे आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डेडिकेटेड लिव्हर आयसीयूची सुरुवात हे महत्त्वाचे पाऊल आम्ही उचलले आहे. किडनी निकामी झाल्यास डायलिसिस करता येते. पण अशी कोणतीच मशीन नाही जी यकृत निकामी झाल्यास त्याचे काम करू शकेल, त्यामुळे यकृताची काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला यावेळी डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांनी दिला.