भरधाव वेगातील वाहनाने पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्लेच्या सेंटॉर ब्रिजवर घडली. जलल धीर आणि सार्थक कौशिक अशी मृतांची नावे आहेत. अपघातप्रकरणी साहिल मेहताला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अपघातात साहिललादेखील इजा झाली आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही सांताक्रुझ येथे राहते. ती कुर्ला येथे एका खासगी विद्यापीठात शिकते. साहिल, जलल आणि सार्थक हे तिचे मित्र आहेत. शुक्रवारी तरुणी आणि साहिल हे दोघे गोरेगाव येथे जललच्या घरी गेले. त्यानंतर ते घरी एकत्र व्हिडीओ गेम खेळत बसले. रात्री ते साहिलच्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. व्होडका प्यायल्यानंतर ते एकत्र जेवण करून गप्पा मारत बसले. त्यानंतर ते घरी गेले. रात्री तरुणीला सार्थकचा फोन आला. तेव्हा तिने जललच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साहिलदेखील जललच्या घरी आला.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ड्राईव्हला जाण्याबाबत चर्चा झाली. साहिलच्या होंडा सिटी कारने ते वांद्रे येथे जायचे ठरले. साहिल हा वाहन चालवत होता, तर तरुणी ही पुढे बसली तर जलल आणि सार्थक हे मागे बसले होते. सुरुवातीला तरुणीने वाहन चालवले. त्यानंतर वांद्रे येथे पोहचल्यावर साहिल हा वाहन चालवत होता. वांद्रे येथे एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पार्सल घेतल्यावर ते जललच्या घरी जाण्यास निघाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून ते जात होते. साहिल हा सुसाट वेगात वाहन चालवत होता. गाडी गोरेगावच्या दिशेने जाणाऱया सर्व्हिस रोडने घ्यावी की पुलावरून घ्यावी त्यामुळे साहिल चलबिचल झाला. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पोलला धडकली. त्यानंतर तरुणीने जललला उपचारासाठी जोगेश्वरी येथील रुग्णालयात नेले. तर साहिलने सार्थकला वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जलल आणि सार्थकचा मृत्यू झाला. घडल्या प्रकाराची माहिती समजताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी आले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल मेहताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल बुधवारी येणार आहे. घडल्या प्रकरणी साहिलला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.