दादर आणि चेंबूर येथील अपघातांत दोघांचा मृत्यू

दादर आणि चेंबूर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही अपघातांत दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. वरळी कोळीवाडा येथे राहणारा सार्थक जंगम (22) हा तरुण दुचाकीवरून जात असताना प्रभादेवीच्या डिपॅथलॉनजवळ त्याची दुचाकी घसरल्याने तो रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून आलेली गाडी त्याच्या डोक्यावरून गेल्याने सार्थकचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी दादर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत, तर भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर मृतकाची पत्नी व मुलगा जखमी झाल्याची घटना शीव-पनवेल मार्गावरील उमरशी बाप्पा चौक येथे घडली. नेरूळ येथे राहणारा शकील शेख (44) हा त्याची पत्नी मुस्कान व मुलगा शरीफसह दुचाकीवरून दादरच्या दिशेने निघाले होते. ते उमरशी बाप्पा चौक परिसरात आले असता मागून वेगात आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. त्यामुळे तिघे रस्त्यावर पडले. यात शरीफ गंभीर जखमी झाला तर शकीलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुस्कानच्या तक्रारीवरून मोटार चालक गरविंदर सैनी (49) याच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.