बिर्याणीत लेग पीस मिळाला नाही, वऱ्हाड्यांचा लग्नमंडपातच राडा; लाथाबुक्क्यांनी मारहाण

लग्न म्हटले की परंपरेसोबतच अनेक गंमती जमती घडत असतात. मात्र उत्तर प्रदेशात एका लग्नात विचित्र प्रकार समोर आला आहे. लग्नातील जेवणात लेग पीस मिळाला नाही म्हणून दोन गट आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. लाथाबुक्क्या, पट्ट्याने मारहाण, खुर्च्या फेकून मारण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याबाबत अद्याप पोलिसात नोंद करण्यात आली नाही. लेखी तक्रार नोंद होताच आरोपींवर कारवाई करू, असे नवाबगंज पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एक लग्न समारंभ सुरु होता. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर वऱ्हाड्यांची जेवणाची पंगत बसली. अचानक एक वऱ्हाडी मद्यधुंद अवस्थेत आला आणि जेवण मागू लागला. मात्र त्याला जेवण न मिळाल्याने तो मिठाईवाल्याकडे गेला आणि वाद करु लागला. हळूहळू वादाने गंभीर रुप घेतले आणि दोन्ही पक्षातील लोक या वादात सहभागी झाले. पाहता पाहता लग्नमंडपाचे रणभूमीत रुपांतर झाले.

दोन्ही पक्षातील लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने मारहाण करु लागले. एवढ्यावरच थांबले नाहीत, मंडपातील खुर्च्या आणि बिर्यानीच्या प्लेट एकमेकांना फेकून मारल्या. लग्नमंडपात उपस्थित एका वऱ्हाड्याने घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. दोन्ही पक्षांनी आपापसात समझोता करत प्रकरण मिटवले.