
वर्चस्वाचा वाद आणि दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना अद्याप सुरूच आहेत. पुण्यातील हे तोडफोड, जाळपोळीचे लोण पिंपरी- चिंचवड, पुणे जिल्ह्याच्या विविध भागातही पसरले आहे. आता तर उजनी जलाशयात मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या दोन होड्यांची तोडफोड करून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे घडली.
पुणे, पिंपरी-चिंचवड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी कोयता गैंगविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली. ठिकठिकाणी कारवाया करून अनेकजणांना जेरबंद केले होते.
काही दिवसांपूर्वी थंडावलेल्या कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले असून, शहराच्या विविध भागात लूटमार आणि वर्चस्वाच्या वादातून रोज वाहने पेटविणे, वाहनांची तोडफोड टोळके करीत आहे. आतापर्यंत शेकडो वाहनांची तोडफोड या टोळक्याने केली आहे.
किरकोळ भांडणे, दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड किंवा जाळपोळ केली जाते. या गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता होते. मात्र, आमच्या वाहनांचे नुकसान होते, त्याची भरपाई कोण करणार.
वाहने पेटविण्याचे आणि तोडफोड करण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. तोडफोड, जाळपोळ, सीट कव्हर फाडणे, वाहनांचे नुकसान या सर्व गुन्ह्यांचा समावेश खोडसाळपणा करण्याअंतर्गत येतो. या गुन्ह्यांसाठी कमीत कमी पन्नास रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अथवा दोन्ही शिक्षांची कायद्यात तरतूद आहे, हे गुन्हे जामीनपात्र आहेत.
उजनी जलाशयात मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या दोन होड्या एका व्यक्तीने रात्रीत तोडफोड करून पेटवून दिल्या. पळसदेव येथील सोमनाथ दिगंबर नगरे रविवारी दुपारी तीन वाजता मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळी टाकून सायंकाळी सहा वाजता घरी परतले. त्यानंतर रात्री चोरट्यांनी नगरे यांच्या १८ फूट लांबीची पत्र्याची व एका लाकडी होडी पेटवून दिली. त्यात दोन्ही होड्यांचे मोठे नुकसान झाले.
पत्र्यांच्या होडीचा पत्रा अनेक ठिकाणी तोडण्यात आला असून, तळाच्या भागाला अनेक ठिकाणी छिद्रे पाडण्यात आली आहेत. घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील अनिल कुचेकर आणि पोलिसांना देताच इंदापूर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन बोराडे, सूरज कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी येथील मच्छीमारांमधून करण्यात आली आहे.
आरोपींकडून वाहनांची नुकसानभरपाई वसूल करा
कर्ज काढून, हप्त्यावर घेतलेल्या वाहनांचे कर्ज फेडायच्या आतच नुकसान होते, हे विचारात घेऊन या आरोपींकडूनच या वाहनांची नुकसानभरपाई वसूल करणे, हा एकच पर्याय असून त्यामुळे इतरांना जरब बसेल. वारंवार होणाऱ्या घटना रोखता येतील. West Maharashtra Edition