ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरला, संकट उभं केलं. पण संकटापूर्वी जेवढी शिवसेना होती आता संकटानंतर कित्येक पटीने शिवसेना उभी राहिली आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मशालीसारखे धगधगते राहिलात तर हा शत्रू आसपासही फिरकणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने, कोल्हापूरमधील राधानगरी विधानसभेचे माजी आमदार के. पी. पाटील आणि श्रीगोंदा विधानसभेतील अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले काही दिवस मातोश्रीत इनकमिंग जोरात सुरू आहे. माझ्यावर नेहमी टीका होते की, हे घरी बसून काम करतात. संपूर्ण दुनिया जर माझ्या घरी येत असेल तर यापेक्षा भाग्यवान अजून कोण असेल. माझे आजोबा म्हणायचे की संकटाच्या छाताडावर चालून जा. ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरला, संकट उभं केलं. पण संकटापूर्वी जेवढी शिवसेना होती आता संकटानंतर कित्येक पटीने शिवसेना उभी राहिली आहे. नवनवीन सहकारी येतात आणि भेटतात. हे लढवय्ये आहेत. हा विजय नक्की झाला आहे. पण गाफील रहायचे नाही. समोरचा शत्रू हार मानणारा नाही. शत्रू साम, दाम, दंड, भेद करेल. सगळ्या उचापात्या करून जिंकायचा प्रयत्न करेल. पण तुम्ही जर जागे राहिलात आणि मशालीसारखे धगधगते राहिलात तर हा शत्रू आसपासही फिरकणार नाही. जागे राहा आणि आपली धगधगती मशाल घरोघरी न्या. हीच मशाल घेऊन भ्रष्टाचार जाळून टाका. आपलं शिवशाहीचं सरकार परत आणा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.