![beed accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/beed-accident-696x447.jpg)
बीड जिल्ह्यात अपघातांची माहिती सुरुच आहे. शुक्रवारी केजजवळ दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच रात्री बाराच्या सुमारास मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील रहिवासी डॉ. मंथन माणिकराव चव्हाण आणि डॉ. ऐश्वर्या मंथन चव्हाण हे नवदाम्पत्य आणि त्यांच्यासोबत डॉ. मृणाली भास्कर शिंदे आणि डॉ. ओमकार ज्ञानोबा चव्हाण हे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनावरून परतत असताना बीड तालुक्यातील मांजरसुंबा जवळ त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात झाला. या अपघातात डॉ. ओमकार आणि डॉ. मृणाली यांचा मृत्यू झाला, तर इतर तीन जण जखमी झाले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अपघातांची मालिकी सुरुच आहे. याआधी 7 फेब्रुवारी रोजी अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान जेजुरीवरून येताना कारचा अपघात झाला होता. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.