महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. तर सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री ही घटना घडली.
अपघातात बीड येथील नामदेव बाबुराव आढाव आणि दौंडमधील सुवर्णा संतोष होले या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांना उपाचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूरकडे जाणाऱ्या एमएसआरटीसी बस वरवंड गावाजवळ दुचाकीस्वाराला टाळण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. बस दुभाजकाच्या विरुद्ध बाजूस वळल्याने दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली.
या बसमध्ये सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जामखेड-स्वारगेट बस (MH11BL 9411) आणि पुण्याहून येणारी पुणे-तुळजापूर बस (MH14 BT 3379) यांचा समावेश होता. दोन्ही बसचे चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून, इतर तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.