भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला. भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याच वेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. ही घटना हिंजवडी- माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (24 रोजी) सायंकाळी घडली. डंपरचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रांजली महेश यादव (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय – 22, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली.
प्रांजली आणि आश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला. बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाली. दरम्यान, 22 वर्षीय डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे.
डंपरमध्ये 32 टन सिमेंट
डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होते. डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते.