हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच सैनिकी शाळेतील दोन वर्गमित्रांची लष्कर प्रमुख व नौदल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख पदी उपेंद्र द्विवेदी यांची तर नौदल प्रमुख पदी दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे दोन्ही अधिकारी 1970 साली मध्यप्रदेशमधील रेवा शहरातल्या सैनिकी शाळेत पाचव्या इयत्तेत एकाच वर्गात शिकले होते. इयत्ता पाचवीच्या अ तुकडीत हे दोघे शिकत होते.
लष्कराचे प्रवक्त ए भारत भुषण बाबू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. ”देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सैनिकी शाळेतल्या एकाच वर्गातून शिकून गेलेले दोन विद्यार्थी लष्कर व नौदलाच्या प्रमुख होणार आहेत. मध्य प्रदेशमधील रेवा येथील सैनिकी शाळेला या दोन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मान मिळाला आहे’, असे ट्विट भारत भूषण बाबू यांनी केले आहे.