नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; दोन बस नदीत वाहून गेल्या, 63 प्रवासी बेपत्ता

नेपाळमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे भीषण दुर्घटना नेपाळमध्ये घडली आहे. भूस्खलनामुळे दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या आहेत. दोन्ही बसमधील चालक आणि प्रवासी मिळून एकूण 63 जण या बसेसमध्ये वाहून गेले आहेत. प्रशासनाकडून सर्वांचा शोध सुरु आहे. शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता ही दुर्घटना घडली. मदन-आश्रित राज्यमार्गावर भूस्खलन झाल्याने ही घटना घडली. सदर बस बीरगंडहून काठमांडूला चालली होती. भूस्खलन झाल्याने बस नदीत कोसळल्या. बेपत्ता प्रवाशांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळते.

घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी हजर दाखल झालो आहोत. शोध मोहिम सुरु हाती घेतली आहे. मात्र पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे, अशी माहिती चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिली. दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. “नारायणगड-मुग्लिन रोडवर झालेल्या भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे पाच डझन प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे तसेच पूर आणि भूस्खलनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रवाशांचा शोध घेण्यासाठी प्रभावी मोहिम राबवण्याचे निर्देश देतो.” असे दहल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.