वेळास समुद्रात बुडून दोन भावंडांसह तिघांचा मृत्यू, क्रिकेट खेळणे जीवावर बेतले

श्रीवर्धनच्या वेळास समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. मयुरेश पाटील (23), अवधूत पाटील (26) व हिमांशू पाटील (21) अशी त्यांची नावे असून या घटनेमुळे पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी कोरी कार घेतली होती. ही कार घेऊन मयुरेश व अवधूत हे दोघे सख्खे भाऊ नवी मुंबईहून आलेला नातेवाईक हिमांशू याच्यासह वेळास समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेले. किनाऱ्यावर क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल समुद्राच्या पाण्यात जाऊन पडला. तो आणण्यासाठी हिमांशू हा खोल पाण्यात गेला, पण बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. आपल्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्या हिमांशूचा थांगपत्ता न लागल्याने मयुरेश व अवधूत हे दोघेही समुद्रात त्याला शोधण्यासाठी गेले, पण लाटांचा मारा एवढा होता की तेही पाण्यात बुडाले. स्थानिक बोट चालकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नव्या गाडीचाही आनंद क्षणिक ठरला. गोंडघरमधील ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.