
कोल्हापूर जिल्ह्यात तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील धरण आणि नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. आता राधनागरी धरणाचे दोन स्वंयचलीत दरवाजे बंद झाले असून दोन दरवाज्यातून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी 6.58 वाजता राधनगरी धरणाचे स्वंयचलित द्वार क्रमांक 4 बंद झाले. त्यानंतर सायंकाळी 7.10 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 5 बंद झाले आहे. त्यामुळे आता धरणाची द्वार क्रमांक क्र. 6 आणि 7 अशी दोन दारे उघडी आहेत. त्यातून 2856 क्युसेक्स आणि बीओटी पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक्स असा एकूण 4356 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. या विसर्गामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत तासाला एक इंचाची वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.