
मानवी आरोग्यास अपायकारक एनडीपीसी घटक असलेल्या गुंगीकारक गोळ्यांची (टॅब्लेट) नशा करण्यासाठी विक्री करणाऱ्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 7 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 8 लाख 18 हजार 400 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या अकोला आणि अमरावती येथील दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ते परराज्यांतून गोळ्या आणून कमी किमतीत विक्री करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सागर आठवले (रा. अकोला) आणि कपिल किसनलाल साहू (रा. अमरावती) अशी संशयितांची नावे आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अल्तमश ऊर्फ अलमश शेख निसार शेख (रा. शेरसवारनगर, जुना जालना) यास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 7 हजार 120 रुपयांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याला संशयित संतोष बालासाहेब जाधव (रा. वसुधरानगर),राहुल भागाजी गायकवाड (विराज मेडिकल) यांनी गोळ्यांचा पुरवठा केल्याचे समोर आले. पथकाने संतोष जाधव व राहुल गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, उद्धव शिवाजी पटारे (41) हा गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी उद्धव पटारे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, प्रतिबंधित घटक असलेल्या तीन प्रकारच्या गोळ्यांचा तसेच गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा मोठा साठा पलंगाच्या बॉक्समध्ये आढळून आला होता. त्याच्या ताब्यातील 8 लाख 18 हजार 400 रुपयांचा साठा जप्त केला. पोलिसांनी त्याला गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, रुस्तुम जैवळ, कैलास खर्डे, हजारे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, चंद्रकला शडमल्लू, संदीप चिंचोले, किशोर पुंगळे, सचिन राऊत, योगेश सहाने, गणपत पवार, रमेश पैठणे आदींनी केली.