धूम स्टाईलने मोटरसायकल चालवून अभिनेत्रीचा मोबाईल चोरी करणाऱया दुकलीला खार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. सिद्धार्थ पाटील आणि सादिक शेख अशी या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार या अभिनेत्री असून त्या खार परिसरात राहतात. 29 ऑक्टोबरला त्या मित्रासोबत कामानिमित्त बाहेर जात होत्या. तेव्हा मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिची पर्स हिसकावून पळ काढला. त्या पर्समध्ये तिचा मोबाईल होता. घडल्या प्रकरणी तिने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव काटकर, पोलीस उपनिरीक्षक पुंभारे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी सिद्धार्थ पाटील आणि सादिक शेख या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान त्यांनीच तक्रारदार अभिनेत्रीचा आयफोन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ते दोघे मोबाईल चोरीसाठी मोटरसायकलचा वापर करतात. त्यांनी खार आणि वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.