
मोबाईल घेऊन पळून गेल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. अशोक तुळसे असे मृताचे नाव आहे. सुरेश दुनघव आणि लक्ष्मण दुनघव अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
अशोक हा साकीनाकाच्या सफेद पूल परिसरात राहत होता. तर दुनघव हे पिता-पुत्र हेदेखील त्याच परिसरात राहतात. अशोकने सुरेशचा मोबाईल घेऊन पळ काढला होता. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी रात्री अशोक हा एका बारसमोर बसला होता. तेव्हा सुरेश आणि लक्ष्मण तेथे आले. त्यांच्यात मोबाईल चोरीवरून शाब्दिक वाद झाला. रागाच्या भरात त्या दोघांनी अशोकला बेदम मारहाण केली.
मारहाण करून त्याला रस्त्यावर फेकून दिले. त्यामुळे अशोकच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर ते पितापुत्र तेथून निघून गेले. जखमी अशोकला स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याची माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी सुरेश आणि लक्ष्मणविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्या दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.