ओला चालकाकडून अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण, सहा तासांत आरोपीला बेड्या

वारंवार सांगूनही मैत्रीचे संबंध ठेवत नाही म्हणून माथेफिरू तरुणाने महिलेला अद्दल घडविण्यासाठी तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. पण महिलेने तक्रार देताच देवनार पोलिसांनी तत्काळ त्या बालकाची सुटका करून अपहरण करणाऱ्या चालकाला पकडले.

गोवंडीच्या गौतम नगर परिसरात तो मुलगा त्याची आई व अन्य भावंडांसह राहतो. सोमवारी सकाळी मुलांची आई बाहेर गेली असता अज्ञात इसमाने मुलाचे अपहरण केले होते. आई घरी परतल्यावर तिने शोधाशोध केली, पण तो कुठे मिळून आला नाही. तेव्हा परिसरातील एका दुकानदाराने मुलाला तुझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीने घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने लगेच देवनार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल दिली.

अब्दुल शमद शहा (29) या ओला-उबेर चालविणाऱ्या व्यक्तीवर महिलेने संशय व्यक्त केल्याने पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर व पथकाने लगेच अब्दुलचा माग काढायला सुरुवात केली. त्यानुसार सायंकाळी सातच्या सुमारास गाडी मुंब्रा येथून पोलिसांनी अब्दुल याला पकडले. त्यानंतर त्याने नवी मुंबई येथून अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली.

महिलेला अद्दल घडविण्यासाठी मुलाचे अपहरण

अब्दुल हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, परंतु तरीही त्याने त्या मुलाच्या आईकडे मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा तगादा लावला होता. महिला त्याला नकार देत असल्याने त्याने मुलाला ठार मारेन असे यापूर्वीदेखील धमकावले होते. त्यावेळी महिलेने पोलिसांत अब्दुलविरोधात तक्रार दिली होती, परंतु यावेळी अब्दुलने मुलांचे अपहरण केलेच, परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केली.