पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने एका खासगी एजन्सीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात तब्बल २ लाख ५१ हजार १६५ नोंद नसलेल्या मालमत्ता आढळल्या आहेत. यामधील २ लाख ३ हजार ८९४ मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून कर आकारणीची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच १ लाख १३ हजार ८३१ मालमत्ताधारकांना कर आकारणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविली आहे. नोटीस देऊनही कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नियमानुसार मागील सहा वर्षांपासून कर आकारणी करण्याचा इशारा सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 33 हजार 294 मालमत्ता नोंदणीकृत आहेत. शहर दिवसेंदिवस वाढत असताना मोठ्या प्रमाणात नोंदणी न झालेल्या मालमत्ता असण्याची शक्यता होती. याचाच विचार करून महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि खासगी एजन्सीमार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तब्बल 2 लाख 51 हजार 165 मालमत्ता नोंदणी नसलेल्या आढळून आल्या. यापैकी २ लाख ३ हजार ८९४ मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली. या सर्व मालमत्ता कर कक्षेत आणण्याची कार्यवाही कर संकलन विभागाकडून सुरू आहे.
सर्वेक्षणात आढळलेल्या 1 लाख 13 हजार 831 मालमत्ताधारकांना कर आकारणीसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नोटीस, एसएमएस पाठविण्यात आले आहेत. या मालमत्ताधारकांनी मालमत्तेस अद्ययावत व बिनचूक नाव लावण्यासाठी आणि बांधकाम झालेल्या दिनाकांपासून कर आकारणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. अद्यापपर्यंत ज्या मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा मालमत्ताधारकांना पुन्हा कागदपत्र मागणीपत्राची अंतिम नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. कागदपत्रे मागणीची नोटीस समक्ष तसेच मालमत्ता बंद असल्यास मालमत्तेच्या दर्शनीभागावर लावून बजावणी करण्यात येत आहे. जे मालमत्ताधारक कर आकारणीसाठी नोटीस बजावूनही कागदपत्रे उपलब्ध करून देत नसल्यास याबाबत त्यांना कोणतेही स्वारस्य नाही असे समजण्यात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार मागील सहा वर्षांपासून संबंधित मालमत्तांना कर आकारणी केली जाणार आहे.
या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे इमारत, जमीन, फ्लॅटची मालकी हक्काची कागदपत्रे खरेदीखत किंवा इंडेक्स 2, सातबारा उतारा, मिळकतपत्रिका, मालमत्ता एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडील असल्यास रजिस्टर अॅग्रीमेंट, दस्त व संबंधित संस्थेने निर्गमित केलेल्या ताबा पत्राची सत्य प्रत, मिळकतीबाबत नोंदणीकृत बक्षीसपत्र, वाटणीपत्र झाले असल्यास त्याची सत्य प्रत, इमारत बांधकाम परवानगी प्राप्त असल्यास मंजूर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व मंजूर नकाशाची प्रत देणे आवश्यक आहे.
…तर महापालिकेची जबाबदारी नाही
महापालिका हद्दीमधील अद्यापि कर आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी करआकारणीसाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसांमध्ये विभागीय करसंकलन कार्यालयामध्ये जमा करावीत. मालमत्ताधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर देण्यात आलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा नमूद केलेल्या ई-मेलद्वारेही कागदपत्रांची पूर्तता करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. योग्य आकारणीसाठी नागरिकांनी तत्काळ कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा नोटीस बजावूनही कागदपत्रे सादर न केल्यास आणि अयोग्य आकारणी झाल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची राहणार नाही. अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.