
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात कृषी पंप चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे संगमवाडीजवळ घोडनदी पात्रालगत आण्णापूर के. टी. बंधाऱ्याजवळून दोन शेतकऱ्यांचे वीज कृषी पाणी पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रीक मोटारी पुन्हा चोरट्यांच्या रडारवर असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. याप्रकरणी पोपट भाऊ खाडे (वय ६५, रा. म्हसे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
17 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पोपट खाडे यांनी आण्णापूर के. टी. बंधाऱ्याजवळील घोडनदी पात्रात साडेसात एचपीची इलेक्ट्रीक मोटार लावून शेतीस पाणी देण्यासाठी सुरुवात केली. लाईट गेल्याने सकाळी नऊ वाजता ते घरी गेले. त्याचठिकाणी त्यांचे शेजारी संतोष प्रभू खाडे यांची ही कृषी पंप मोटार सुरू होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे मोटारी चालू करण्यासाठी गेले असता, मोटारी गायब असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच मोटारीचे वायर, पाईप्स कापलेले होते. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही मोटारी सापडल्या नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी मोटारी लंपास केल्याची खात्री दोन्ही शेतकऱ्यांना झाली. या घटनेचा तपास हवालदार अरुण उबाळे करत आहेत.
मोटार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या साधनांची चोरी होणे, ही बाब चिंताजनक असून, मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पोलीस प्रशासनाने अशा प्रकारांवर कटाक्षाने लक्ष ठेवत, चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.