देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुलाच्या फायरिंग रेंजवर गुरुवारी सरावादरम्यान तोफेचा गोळा फुटल्याने दोन प्रशिक्षणार्थी अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक हवालदार जखमी आहे.
देवळाली कॅम्पच्या आर्टिलरी सेंटर येथे अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू आहे. अग्निवीरांचा एक चमू शिंगवे बहुला फायरिंग रेंजवर गुरुवारी दुपारी इंडियन फिल्ड गन क्रमांक ४ या तोफेतून गोळे डागण्याचा सराव करत होते. अचानक एक गोळा निर्धारित जागेवर जाण्यापूर्वीच फुटला, त्याचे धातूचे तुकडे सर्वत्र उडाले. त्यामुळे जवळच असलेले पश्चिम बंगालचे गोहिल विश्वराज सिंग (20), गुजरात राज्यातील सैफत शित (21) हे अग्निवीर व हवालदार अप्पाला स्वामी (40) हे जखमी झाले. नाईक सचिन चव्हाण, आदर्श व्ही. के., नायब सुभेदार सुदेश मामेन, सुंदर राज यांनी जखमींना लष्करी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी गोहिल व सैफत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अप्पाला यांच्यावर उपचार सुरू आहेत. हवालदार अजित कुमार यांनी दिलेल्या माहितीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. उपनिरीक्षक पी. एस. देवरे अधिक तपास करत आहेत.