जालन्यात भरदिवसा घरफोडी; अवघ्या आठ तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

जालन्यात भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. जालन्यातील देवमूर्ती गावात ही घटना घडली आहे. विठ्ठल तुकाराम चव्हाण यांच्या घरी 11 ऑगस्ट रोजी ही जबरी चोरी झाली. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ सूत्र हलवत अवघ्या आठ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.

या दोन्ही आरोपींविरोधात 58 गुन्हे दाखल असून चार जिल्ह्यात वाँटेड आहेत. आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अर्जुनसिंग छगनसिंग भोंड आणि सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आरोपी देऊळगावराजाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळी पथके तयार केली. पोलीस पथकांनी आरोपींचा देऊळगावराजा बुलढाणापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर आरोपी पुन्हा जालना जिल्ह्याकडे निघाले असता त्यांना कन्हैयानगर चौफुली येथे शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून एकूण 7 लाख 14 हजार 380 रुपये किंमतीचा चोरी केलेला ऐवज, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलीस ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी याच्यावर 31 गुन्हे तसेच अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याच्याविरुद्ध 27 असे दोघांविरोधात 58 गुन्हे दाखल आहेत.