
पवई आणि विलेपार्ले येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. जेसीबी अंगावर गेल्याने एका व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला. या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. तर वीरेंद्र मिश्रा यांच्या मोटरसायकलला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
पहिली घटना शनिवारी रात्री विलेपार्ले परिसरात घडली. जुहू पोलिसांचे पथक नाकाबंदीवर असताना त्यांना येथील गोल्डन टोबेकोसमोर अपघात झाल्याची माहिती मिळाली. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता जेसीबी वाहन या व्यक्तीच्या अंगावरून गेल्याचे आढळून आले. फरार जेसीबी चालक आणि क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. वीरेंद्र मिश्रा हे पवई प्लाझा सिग्नलजवळून जात असताना त्यांच्या मोटरसायकलला टेम्पोने धडक दिली. या धडकेत मिश्रा यांचा मृत्यू झाला.