ट्विटरच्या निळ्या चिमणीची 30 लाखांना विक्री

ट्विटरवरील निळ्या चिमणीच्या लोगोकडे कधी काळी सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध लोगो म्हणून पाहिले जात होते. परंतु, एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरऐवजी त्याचे नाव ‘एक्स’ केले. तसेच त्याचा लोगोही बदलला. आता अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटरच्या मुख्यालयावर लावलेला निळ्या चिमणीचा आयकॉनिक लोगोचा लिलाव करून विक्री करण्यात आली.

या निळ्या चिमणीचा लोगो 34,375 डॉलर म्हणजेच जवळपास 30 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे. ही चिमणी जवळपास 254 किलो वजनाची आहे. याचा आकार 12 फूट लांब आणि 9 फूट रुंद आहे. या चिमणीसाठी 30 लाख रुपये नेमके कोणी मोजले, हे अद्याप उघड केले नाही. या निळ्या चिमणीशिवाय, ऍपल-1 कॉम्प्युटरला जवळपास 3.22 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.