आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 21 लाख नागरिकांना पूराचा फटका, 24 तासात सहा जणांचा मृत्यू

गेले चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या 24 तासात आणखी सहा जणांचा बळी घेतला असून मृतांचा आकडा आता 56 वर पोहचला आहे. राज्यात सुमारे 21 लाख नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सुमारे 29 जिल्ह्यांना पूराने वेढले आहे.

धुबरी जिल्ह्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथील सहा लाखांहून अधिक लोक बाधीत झाले आहेत. तसेच दररंग, कचार, बारपेटा आणि गोलाघाटलाही पूराचा मोठा फटका बसला आहे.

बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, बोंगाईगाव, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, गोलपारा, गोलाघाट, कामरूप, कामरूप मेट्रो आणि कोक्राझार यासह काही ठिकाणी पुढील तीन तासात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता गुवाहाटी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली असून बराक नदीही धोक्याच्या पातळीवर आहे.

पूरबाधित 39 हजार लोकांचे 698 छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच 635 प्राण्यांना वाचवण्यात आले आहे. राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी महानगर क्षेत्रातील मालीगाव, पांडू बंदर, मंदिर घाट आणि माजुली येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली.