तेरावं गावी परतत असताना भरधाव बसने मिनी ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात आग्रा-अलीगड बायपासवर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
मॅक्स लोडरमध्ये एकूण 30 जण होते. हे सर्व खंदौलीतील सेवला गावचे रहिवासी असून मुकुंद खेडा येथे तेराव्यासाठी गेले होते. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून गावी परतत असतानाच आग्रा-अलिगड बायपासवर ही घटना घडली. मृतांची आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हायर सेंटर येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.