“भाजपची राजवट आली अन् फक्त 2 वर्षात…”, जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर

महायुती सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे ढकलत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत जयंत पाटील यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र जयंत पाटील यानी फडणवीस यांना चोख उत्तर देत चांगलेच सुनावले आहे. या दोन्ही नेत्यांमधील हे ट्विटर वॉर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राती सहाव्या स्थानावर घसरण झाल्याने जयंत पाटील यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले होते. दरडोई उत्पन्नात क्रमांक १ वर असणारे आपले महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर गेले आहे. कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहेत. 20222-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हा 5 व्या क्रमांकावर होता. आता आपल्या राज्याची घसरण 6 व्या क्रमांकावर झाली आहे. मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला होता.

जयंत पाटील यांची बोचरी टीका चांगलीच लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. जयंतराव, खोटे बोलायचे तरी किती? बाकीच्यांनी खोटा नरेटिव्ह पसरविला, तर समजू शकते. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे?

महाविकास आघाडीचा काळ आठवून पहा…
2020-21 : 1,82,454 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
2021-22 : 2,19,573 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
आणि आता
2022-23 : 2,52,389 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलतीलच. पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, ही अपेक्षा! असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता या ट्विटला जयंत पाटील यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्र रसातळाला; उद्योग – व्यवसाय पळविणाऱ्या गुजरातने मागे टाकले

देवेंद्रजी, मोठ्या व मध्यम राज्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या 2-3 मध्ये असायचा. भाजपची राजवट 2014-15 ला आली व आपण मुख्यमंत्री झालात फक्त 2 वर्षात 2017-18 मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला व तो कायम पुढे राहिला आहे व हा NARRATIVE नाही तर ही अख्या महाराष्ट्राची खरी खंत आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.