स्वयंपाकघर – थोडी खट्टी थोडी मिठ्ठी

>> तुषार प्रीती देशमुख

संजनाला आवडणारे पदार्थ तिच्या तब्येतीला मानवेल अशा पद्धतीने चमचमीत बनवून प्रेमाने खाऊ घातल्यावर संजनाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. गोड स्माईल देत जेव्हा ती बहिणीला म्हणते “बिगीज, तू अमेझिंग आहेस, तू माझी होम शेफ आहेस, तू माझी मास्टर शेफ आहेस. तुझ्याशिवाय या जगात इतकं टेस्टी जेवण कोणी बनवूच शकत नाही,’’ तेव्हा तिची बहीण गायत्रीला जग जिंकल्याचा आनंद होतो. या दोन बहिणींमधील प्रेमाचं दृढ नातं वाढवणारा घटक म्हणजे खाद्य पदार्थ! संजना आणि गायत्री या दोन बहिणींची ही आगळीवेगळी चमचमीत, चटकदार, थोडी खट्टी थोडी मिठ्ठी कहाणी.

गायत्रीचा पाचवा वाढदिवस तिला जोरदार साजरा करायचा होता. मग तिची आई कांचन पोरे यांनी तिच्या इच्छेनुसार स्वतःला नववा महिना चालू असतानाही दणक्यात साजरा केला, पण त्याच रात्री कांचनताईंना अॅडमिट करावे लागले. 17 तारखेला हरतालिकेच्या दिवशी संजनाचा जन्म झाला. डॉक्टरांनी कांचनताईंना बाळ क्रिटिकल असल्याचे सांगितले. त्या वेळी नोकरीनिमित्त ताईंचे पती परदेशात होते, पण त्यांनी न खचता सर्व परिस्थिती खंबीरपणे सांभाळली. तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीला ‘डाऊन सिंड्रोम’ हा आजार असल्याचे कळले. आईवडिलांनी आपल्या मुलीला तिच्या आजारासह स्वीकारले.

गायत्रीला सुरुवातीला आपल्या बहिणीला बरे नाही, तिची काळजी घ्यावी लागेल, इतकेच सांगितले होते. त्याप्रमाणे ती आपल्या लहान बहिणीची काळजी घेऊ लागली. गायत्रीसाठी संजना हे जगातले सर्वात लाडके बाळ झाले होते. संजनाने कधीच हट्ट केला नाही, पण गायत्री तिच्या इच्छा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. गायत्रीला लहानपणापासूनच तिच्या आवडीचे सर्व पदार्थ खायला मिळत होते, पण तिची बहीण संजनासाठी आपली आई वेगळा स्वयंपाक का करते हा प्रश्न तिला नेहमी पडायचा.

कांचनताई आपल्या दोन्ही मुलींबरोबर परदेशी नवऱयाकडे गेल्या होत्या तेव्हा आईवडिलांनी गायत्रीला तिच्या बहिणीला असलेल्या डाऊन सिंड्रोम या आजाराबद्दल सांगितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ती तिच्या आईबाबांना म्हणाली, “संजना माझी छोटी बहीण आहे. जी माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी तिची तशीच खास काळजी घेणार.’’ हे ऐकून दोघांना आनंद झाला आणि खरेच त्याप्रमाणे गायत्रीने आपल्या बहिणीची काळजी घ्यायला सुरुवातही केली.

कांचनताईंनी दोन्ही मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नाष्ट्यापासून जेवणापर्यंत त्यांच्या आहाराप्रमाणे स्वयंपाक करावा लागायचा. जसजशी गायत्री मोठी होत होती तसतशी तिने संजनाच्या आजाराबद्दल माहिती मिळवली. जे पदार्थ गायत्री बाहेर खाऊ शकत होती ते सर्व पदार्थ आपल्या बहिणीला खायला मिळावेत म्हणून तिच्या तब्येतीच्या आवश्यकतेनुसार ती बहिणीसाठी घरी बनवू लागली. हळूहळू तिला संजनाची आवड निवड समजू लागली. त्याप्रमाणे ते पदार्थ बनवून तिला पचतील, रुचतील, त्याप्रमाणे त्यात बदल करून ती बनवू लागली. संजनाला त्यांनी रेस्टॉरंटमध्येही नेले होते. संजनाला ते पदार्थ आवडलेही, पण आजारामुळे कमकुवत झालेल्या पचनशक्तीला त्याचा त्रास झाला. तेव्हाच गायत्रीने ठरवले की, जे पदार्थ आपण बाहेर खातो तेच पदार्थ संजनाच्या पचनशक्तीला मानवेल असे घरी बनवायचे. कांचनताईंना त्यांच्या दोन्ही मुलींचा प्रचंड अभिमान आहे. कारण मोठी बहीण आपल्या लहान बहिणीसाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवते आणि छोटी बहीण आपल्या मोठय़ा बहिणीने आपल्या आवडीचा पदार्थ बनवल्यावर प्रतिक्रिया देते. त्या दोघींमधले हे प्रेम, जिव्हाळा पाहून त्यांना खूप आनंद होतो.

कांचनताईंनी गायत्रीला लहानपणापासून अनेक वेगवेगळ्या कलांमध्ये (नृत्य, गायन, संस्कृत) प्रशिक्षण दिले होते. त्या वेळी संजनाला कडेवर घेऊन गायत्रीचा क्लास संपेपर्यंत त्या बाहेर वाट पाहायच्या. हे सर्व पाहून गायत्रीने संजनाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गांमध्ये तिला मदत केली. त्यामुळे आता संजना स्वत अनेक कलाकृती बनवून स्वतचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सक्षम झाली आहे. माझा मित्र अभिजीत जोशी व मैत्रीण गायिका केतकी भावे-जोशी यांनी रक्षाबंधनानिमित्त संजनाने बनवलेल्या राख्या मला दाखवल्या. तेव्हा थेट संजनाच्या घरी जाऊन पोरे कुटुंबाची भेट घडली. सर्व परिस्थितीला, अडीअडचणींना सामोरे जाऊन आज ती सकारात्मक आयुष्य जगते आहे. काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या घरी अचानक जाण्याचा योग आला तेव्हा गायत्रीने संजनासाठी बनवलेला टोमॅटो पास्ता मला चाखायला मिळाला. संजनाने पास्ताचा एक घास खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीने गायत्रीकडे पाहून गोड हसत म्हणाली, “बिगीज, आय लव्ह यू.’’ तिची ही प्रतिक्रिया ऐकण्यासाठी गायत्रीची नजर तिच्याकडे होती. आजपर्यंत फक्त ऐकले होते, “एखाद्याच्या हृदयात जागा निर्माण करायची असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो.’’

गायत्रीला तिच्या पुढील करीअरसाठी परदेशी जाण्याचा योग आला होता, पण केवळ बहिणीसाठी ती गेली नाही. संजनाने तिचे प्रशिक्षण एस.पी.जे. साधना स्कूलमधून पूर्ण केले. संजनाला वाढवताना या तिघांनाही बिकट परिस्थितींना सामोरे जावे लागले, पण आज ते आनंदी आयुष्य जगत आहेत व अनेकांना आनंद देण्याचेही काम करत आहेत.

[email protected]