स्वयंपाकघर – आईच्या हातची चव

>> तुषार प्रीती देशमुख

अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱया, अत्यंत आवडणाऱया पदार्थांमध्ये अधिराज्य गाजवणाऱया ‘घरगुती मालवणी’ पदार्थांची चवच लय भारी. ज्यात प्रेमाने, कष्टाने बनवलेल्या घरगुती मसाल्याची व वाटपाची लज्जत असते. याच मालवणी पदार्थांची रुचकर मेजवानी गेली 38 वर्षे सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालणारे नरेंद्र सावंतदादा ज्यांना सगळेच ‘कोंबडीवडेवाला राजूदादा’ या नावाने ओळखतात. हीच त्यांनी मेहनतीने बनवलेली खरी ओळख, ज्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटतो.

पूर्वीच्या काळात सर्वच गृहिणी सगळे मसाले किंवा पीठ घरी बनवायच्या. तसेच नरेंद्रदादांच्या आई गुणवंती गोविंद सावंत यादेखील सगळे मसाले व पीठ घरी बनवायच्या. त्यांनी बनवलेला मालवणी मसाला, गरम मसाला व मालवणी वडय़ाचे पीठ हे सर्वांच्या आवडीचे ठरले. म्हणून त्यांचे पती गोविंद सावंत यांनी घरगुती मसाले व पिठांच्या विक्रीचा व्यवसाय चालू केला. ज्यात त्यांना खूप यश लाभले. गुणवंतीताईंनी बनवलेले मांसाहारी पदार्थांची आजही अनेक जण आठवण काढतात.

लहानपणापासून आई-वडिलांचा प्रवास नरेंद्रदादा अनुभवला होता. आईच्या हातच्या जेवणाची लज्जत सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने नरेंद्रदादांनी पीठ, मसाले व वाटपाचे प्रमाण तिच्याकडून शिकून घेतले. वयाच्या 22व्या वर्षी नरेंद्रदादांनी कोंबडी-वडे विक्रीचा व्यवसाय दादर येथे फूटपाथवर गाडी लावून सुरुवात केली.

व्यवसाय म्हटले की, आव्हानेही आलीच. प्रत्येक आव्हान त्यांनी हसतमुखाने स्वीकारले. त्यांचा व्यवसाय वाढला तो त्यांच्या पदार्थांच्या चवीमुळे. नरेंद्रदादा जेव्हा संध्याकाळी गाडी लावतात तेव्हा पदार्थांचा खमंग सुवास गिऱहाईकांना आकर्षित करतो. एकदा का गिऱहाईकांनी पदार्थाची चव घेतली की तेच गिऱहाईक अनेकांकडे त्याची स्तुती करतात. त्यामुळे अनेक खवय्ये त्यांच्याकडे यायला लागले. नरेंद्रदादा फक्त कोंबडीवडे नाही तर अनेक इतर पदार्थ खवय्यांना खाऊ घालू लागले. कोंबडीवडे, मटणवडे, कोलंबीचा पुलाव, वजरी मसाला, तिसऱ्या मसाला, खेकडा मसाला, क्रॅब लॉलिपॉप, विविध माशांचे कालवण, फिश फ्राय… ही यादी एवढय़ावरच थांबत नाही. त्यांच्याकडे शाकाहारी जेवणसुद्धा उत्तम मिळते. ज्यात काळा वाटाणावडे म्हणजे एक नंबर! नरेंद्रदादा स्वत मार्केटला जाऊन सगळी सामग्री आणतात. दिवसभर त्याची सर्व पूर्वतयारी करून संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गाडीवर मेहनत करतात.

1996 साली नरेंद्रदादांचा विवाह सोनालीताईंशी झाला. सोनालीताई ब्युटिशियनचा व्यवसाय सांभाळून पतीला जमेल तशी मदत करायच्या. नवरा-बायकोच्या मेहनतीमुळे बघता बघता नरेंद्रदादांचा व्यवसाय वाढू लागला. त्यांनी काही कामगार मदतीसाठी ठेवले. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.

नरेंद्रदादांना अनेक घरगुती जेवणाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. त्यांनी स्वतचा छोटेखानी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दादरमधील शिवाजी मंदिरच्या बाजूला असलेल्या नामांकित मराठा समाजाचा सावंतवाडी हॉल येथे केटरिंग करण्याची संधी मिळाली. एक पाऊल पुढे टाकत 2018 साली नरेंद्रदादांनी दादर येथे भाडय़ाने जागा घेऊन ‘राजूज मालवणी मेजवानी’ या नावाने एक स्वतचे रेस्टॉरंटही चालू केले. कमी वेळातच लज्जतदार चवीमुळे रेस्टॉरंटला ग्राहकांची पसंती मिळाली. बोमन इराणी, अतुल परचुरे, कविता लाड, शिल्पा तुळसकरसारखे अनेक सिनेकलाकार रेस्टॉरंटला जेवायला येत. तसेच अनेक दिग्गज व्यावसायिक, राजकीय नेते त्यांच्या रेस्टारंटमध्ये येत.

कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. नरेंद्रदादांनी भाडय़ाने घेतलेल्या रेस्टॉरंटच्या जागेचे गणित जुळले नाही. 2022 साली रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. न खचता एक पाऊल मागे येत पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी नरेंद्रदादा सज्ज झाले. त्यांनी रेस्टॉरंट चालू असताना गाडी मात्र बंद केली नव्हती. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन एक पाऊल मागे येऊन व्यवसायाची भरभराट करण्याची ताकद व क्षमता आपल्यामध्ये असेल तर आपण पुन्हा उंच भरारी घेऊ शकतो हे नरेंद्रदादांनी त्यांच्या या कोंबडीवडय़ाच्या व्यवसायातील चढ-उताराच्या प्रवासात सगळ्यांना दाखवून दिले. नरेंद्रदादांना मोलाची साथ लाभली ती त्यांचे मित्र राजन भोसले यांची.

नरेंद्रदादांना एक यशस्वी उद्योजक म्हणून अनेक पुरस्कार लाभले आहेत. पुरस्काराबद्दल नरेंद्रदादा म्हणतात, ‘मटण व कोंबडी असो वा मासे, त्याला मसाला लावून चव उतरण्यासाठी तेवढा वेळ दिला तर तो पदार्थ रुचकर बनतो. वडा खमंग बनण्यासाठी वडय़ाचे पीठ मुरवले तरच वडा खमंग बनतो. तसाच हा माझा व्यवसायाचा प्रवास. जितके चढ-उतार तितकीच मेहनत व कष्ट, न खचता जिद्दीने उभे राहत लोकांना प्रेमाने खाऊ घातल्यावरच त्यांची पसंती लाभते. तेव्हा हे पुरस्कार मिळतात.’ ‘राजू मालवणी कॉर्नर’ या गाडीला 39 वर्षे झाली तरी तीच चव आजतागायत आहे. कारण राजूदादा त्यांच्या आईने शिकवल्याप्रमाणे मसाले, वाटप व वडय़ाच्या पिठाचा वापर करतात. त्यामुळेच इथे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपल्या आईच्या हातच्या घरगुती जेवणाची चव मिळत असते.

[email protected]