
‘आपण भाजपचा पराभव करू शकतो. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे परखड मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. यावर भाजप आणि संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, तुषार गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, मी माफी मागणार नाही, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधीजी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते केरळमधील तिरुअनंतपुरम येथे दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी तुषार गांधी यांनी भाजप आणि संघावर परखड शब्दांत टीका केली. ‘भाजपचा पराभव करू शकतो, पण आरएसएस हे विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या घडामोडींची भीती वाटायला हवी. कारण जर आत्माच नष्ट झाला तर सारं काही नष्ट होईल,’ असे तुषार गांधी म्हणाले.