
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सात तलावांत 592866 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटरचा पाणीसाठा पाहता हे पाणी डिसेंबर 2024 पर्यंत पुरणारे आहे. सात तलावांत सध्या एकूण 41 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा होणाऱया तलावांत तुळशी तलाव सकाळी 8.30 वाजता ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईसाठी चांगली बातमी मिळाली आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याआधी पवई तलाव 8 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. पवई तलावाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्यात येते. तर शनिवार, 20 जुलै रोजी तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला. धरण क्षेत्रात पावसाची अशीच दमदार बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच मुंबईकरांवरील 10 टक्के पाणीकपात रद्द होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले. महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ शनिवार, 20 जुलै रोजी सकाळी 8ः30 वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षीदेखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री 1.28 वाजताच्या सुमारास हा तलाव भरून वाहू लागला होता.
20 जुलै रोजी धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा 21,671
मोडक सागर 1,74,999
तानसा 1,11,108
मध्य वैतरणा 72,206
भातसा 2,85,585
तुळशी 17,427
विहार 7,715
असा आहे तुळशी तलाव
1879 मध्ये 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा सर्वात लहान तलाव आहे. तुळशी तलावातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लिटर (1.8 कोटी लिटर) पाणीपुरवठा.