अवघा महाराष्ट्र हळहळला, संत तुकारामांचे वंशज शिरीष महाराजांची आत्महत्या

संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज, प्रसिद्ध शिवव्याख्याते, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार आज  सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. देहू परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी युद्ध हरलो, मला माफ करा, असे म्हणत आई-वडील, मित्र आणि होणारी पत्नी यांच्या नावाने चार  चिठ्ठया लिहून ठेवल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी सर्वांची माफी मागितली असून, आपल्यावर झालेल्या 32 लाखांच्या कर्जाचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या मागे आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.

शिरीष महाराज (32) यांनी सुतारआळी, देहूगाव येथे नुकतेच नवीन घर बांधले होते. घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील राहत होते, तर ते वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दार जोरात ढकलून उघडले असता शिरीष महाराज हे पंख्याच्या हुकाला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

 शिरीष महाराज यांचा शिवव्याख्याते म्हणून नावलौकिक होता. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर ते भाष्य करत असत. वारकरी संप्रदायातही ते सक्रिय होते. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत असत.  बुधवारी सायंकाळी शिरीष महाराज यांच्या पार्थिवावर देहुगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मला माफ करा

आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठय़ांपैकी एक चिठ्ठीमध्ये चार मित्रांचा उल्लेख केला आहे. ‘खरंतर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चूकच आहे, पण कृपा करून आई-वडिलांना सांभाळा. चांगले स्थळ पाहून दीदीचे लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर 32 लाखांच्या कर्जाचा डोंगर आहे. तो आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा, असे या चिठ्ठीत मित्रांना उद्देशून लिहिले आहे. दुसऱ्या चिठ्ठीत प्रिय बाळा आणि सर्व परिवार… खूप कष्ट करा. आपली इकोसिस्टीम उभी करा. मला माफ करा. थांबू नका. लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे’ असे त्यांनी कुटुंबातील सदस्यांना उद्देशून म्हटले आहे.

तिसऱ्या चिठ्ठीत त्यांनी होणाऱ्या पत्नीचा उल्लेख केला आहे. ‘मी हात जोडून माफी मागतो. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही’, असे त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले आहे. चौथ्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आई, वडील आणि बहिणीचा उल्लेख केला आहे. ‘तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही एवढं सुंदर जगलो. कधी-कधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा…, असे त्यांनी या चिठ्ठीत म्हटले आहे.

20 एप्रिलला होणार होते लग्न

शिरीष महाराज यांचा नुकताच विवाह ठरला होता. डिसेंबर 2024 मध्ये त्यांचा कुंकुमतिलक समारंभ झाला होता, तर 20 एप्रिल रोजी त्यांचा विवाह होणार होता. त्यांची लग्न करण्याची इच्छा नव्हती, मात्र कुटुंबाच्या इच्छेखातर त्यांनी लग्नाला होकार दिला होता. शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मोबाईलचा डेटा संपूर्णपणे फॉरमॅट केला असल्याचेही समोर आले आहे.