तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘सेबी’च्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपला. केंद्र सरकारने गुरुवारी पांडे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. तुहिन कांत पांडे यांचा या पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. ते 1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये देशाचे वित्त सचिव म्हणून पांडे यांनी पदभार स्वीकारला होता. तुहिन कांत पांडे यांनी वित्त सचिव म्हणून अर्थमंत्र्यांना धोरणात्मक बाबींवर सल्ला देण्यात आणि मंत्रालयाच्या कामकाजाचे व्यवस्थापन यात महत्त्वाची भूमिका निभावली. दरम्यान, ‘सेबी’च्या मावळत्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी मार्च 2022 मध्ये कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अनेक आरोप केल्यानंतर पुरी यांना चौकशीचा सामना करावा लागला. माधवी पुरी-बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला होता.