
त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूच्या हत्येची घटना उघड झाली आहे. मद्यपीच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे.
आगामी सिंहस्थ पुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये साधूंचा वावर वाढला आहे. सोमवारी एका दुकानाच्या पायरीवर साधूचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. यानंतर या साधूला मद्यपी मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही साधूंनी पोलिसांना दिले. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, ही साधू वेशातील मृत व्यक्ती इगतपुरी तालुक्यातील आहे, प्रभाकर घोटे असे त्याचे नाव आहे. साधू आहे की फिरस्ता, याचा तपास सुरू आहे. त्याला मारहाण करणाऱया सीसीटीव्हीतील त्या मद्यपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर परिसरातील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.