
पोगाव येवई येथील डोंगरावर असलेल्या दिंडेश्वर महादेव मंदिरातील ट्रस्टींनीच ९८ लाख रुपये हडपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ट्रस्टींनी मंदिराच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ट्रस्टचे अध्यक्ष माणक पाटील, खजिनदार ज्ञानेश्वर भोईर, सेक्रेटरी विनायक वखारे व तानाजी भोईर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दिंडेश्वर महादेव मंदिरातील ट्रस्टींनी संगनमत करून मंदिराच्या बँक खात्यातून व दानपेटीतून आलेल्या ९८ लाख ५१ हजार ४८१ रुपयांचा अपहार केला. माणक पाटील, ज्ञानेश्वर भोईर व विनायक वखारे यांनी कोणताही ठराव न करता मंदिराच्या बँक खात्यातून हवे तसे पैसे काढून घेतले, तर खजिनदार ज्ञानेश्वर भोईर यांनी त्यांच्या मुलगा तानाजी भोईर याला ५ लाख २८ हजार रुपयांचा धनादेश दिला. मंदिर ट्रस्टींकडून सुरू असलेल्या गैरव्यवहाराबाबत आक्षेप घेत दुगाड येथील मारुती पाटील यांनी न्यायालयात धाव घेत कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशपुरी पोलिसांनी जुलै २०२४ मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
मंदिरातील ट्रस्टी विनायक वखारे आणि ज्ञानेश्वर भोईर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी टाळाटाळ केली. अखेर दहा महिन्यांनंतर १ एप्रिल रोजी पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. उर्वरित दोघांची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी संदीपान सोनावणे यांनी दिली.