अजित दादांच्या आडून धनंजय मुंडेच पालकमंत्री पद बघताहेत? तृप्ती देसाई यांचा सवाल

“बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची दररोज नवीन घटना बाहेर येत आहे, मात्र अजित पवार यावर काहीच बोलत नाही. मग अजित पावर नेमकं पलिकमंत्रीपद चालवत आहेत की, त्यांच्या आडून धनंजय मुंडेच पालकमंत्री पद बघताहेत”, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. तृप्ती देसाई या सध्या बीड दौऱ्यावर असून त्यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्या वाल्मीक कराड याला मदत करण्याचा आरोप असलेल्या 26 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार करण्यासाठी बीड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, “नवनीत कॉवत हे बीडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आल्यापासून जिल्ह्यात चांगलं काम सुरु आहे. पण इथे अजूनही अनेक जुनेच अधिकारी आहेत. जे अजूनही वाल्मीक कराड याच्या टोळीशी संपर्कात आहेत. अजूनही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे. धनंजय मुंडे हे पालमंत्री जरी नसले तरी, अजित पवार गटाकडेच येथील पालकमंत्रिपद आहे. अजित पवार तर कुठेच दिसत नाही. दररोज नवीन घटना बाहेर येत आहे, मात्र अजित पवार यावर काहीच बोलत नाही. मग अजित पावर नेमकं पलिकमंत्रीपद चालवत आहेत की, का त्यांच्या आडून धनंजय मुंडेच पालकमंत्री पद बघताहेत.”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना माझी मागणी आहे की, 27 तारखेपर्यंत अधिवेशन सुरु आहे. तोपर्यंत दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचर्यांना जिल्ह्यातून बाहेर काढून त्यांचं निलंबन करावं. तरच बीडमधील गुंडाराज थांबू शकेल.”