US-China-Trade-War- ट्रम्प यांचा घाव चीनच्या वर्मी; युआन 18 वर्षांच्या निचांकी पातळीवर

अमेरिका चीनमधील व्यापार युद्ध टॅरिफमुळे आणखी तीव्र झाले आहे. गेल्या मंगळवारी अमेरिकेने चीनवर 104% कर लादला होता. त्याला प्रत्युत्तर देत दुसऱ्याच दिवशी चीनने अमेरिकेवर 84 कर लादला. चीनने हा कर मागे घेतला नाही तर अमेरिका चीनवर 50 टक्के अतिरिक्त कर लादेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मात्र, ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चीन धोरणावर ठाम होता. त्यामुळे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे ट्रम्प यांनी बुधवारी इतर देशांवरील टॅरिफच्या निर्णयाला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली तर चीनवरील टॅरिफ 125% पर्यंत वाढवला.ट्रम्प यांचा हा घाव चीनच्या वर्मी लागला असून चिनी चलन युआनमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून तो 18 वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहचला आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच अमेरिका आणि चीनमध्ये सर्वात मोठे व्यापार युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. चीनच्या 84 टक्के कर लादण्याच्या प्रत्युत्तरात, ट्रम्पने त्यावर 125 टक्के टॅरिफ लादला आहे. चीन अमेरिकेला कडवी टक्कर देत असला तरी या व्यापार युद्धामुळे चिनी चलनावर विपरीत परिणाम झाला आहे. 2007 पासून चिनी चलन युआन 18 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहे.

युआन प्रति डॉलर 7.3498 वर बंद झाला. रॉयटर्सच्या अहवालात तज्ज्ञांचा हवाला देऊन म्हटले आहे की, चीनचे सर्वोच्च नेते चीनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भांडवली बाजार स्थिर करण्यासाठी उपाययोजनांवर भेटण्याची आणि विचार करण्याची योजना आखत आहेत. टॅरिफच्या दबावाला न जुमानता, चीनच्या मध्यवर्ती बँकेने प्रमुख सरकारी बँकांना अमेरिकन डॉलर्सची खरेदी कमी करण्यास सांगितले आहे.

कॅपिटल इकॉनॉमिक्सने एका नोटमध्ये म्हटले आहे की अमेरिकेच्या नवीन टॅरिफ वाढीचा अर्थ असा आहे की येत्या काही वर्षांत चीनची अमेरिकेतील निर्यात निम्म्याहून अधिक कमी होईल. त्यात म्हटले आहे की यामुळे चीनचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 1-1.5% कमी होऊ शकते, परंतु ही घट इतर देशांमधून होणाऱ्या निर्यातीच्या प्रमाणात अवलंबून असेल. हा अपेक्षेपेक्षा मोठा धक्का आहे, परंतु तो आर्थिक सक्षमतेमुळे त्याचा फासरा परिणाम होणार नाही. देश कोणत्याही आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार युद्धामुळे चीनच्या चलनात घसरण झाली अशली तरी चीनमधील शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. शांघाय कंपोझिट 1.50 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे, तर चीन A50 देखील सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यापार करताना दिसून आला. डीजे शांघायने 1.47टक्के वाढ नोंदवली, तर हँग सेंगने 3 टक्क्यांनी वाढ नोंदवली. या व्यापार युद्धात चीन किंवा अमेरिका दोघेही झुकण्यास तयार नाहीत. त्यामुळे आगामी काळात टॅरिफ वॉर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.