अडीचशे घुसखोर हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमानाचे उड्डाण

अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. अतिरिक्त आयात शुल्कानंतर त्यांनी आपला मोर्चा बेकायदा स्थलांतरितांकडे वळवला असून घुसखोर हिंदुस्थानींना परत मायदेशात पाठवण्यासाठी आजपासून सुरुवात केली. आज 250 घुसखोर हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान टेक्सास येथील सॅन अँटोनियो येथून  अमृतसरसाठी रवाना झाले.

 अमेरिकन हवाई दलाच्या सी-17 या विमानाने हिंदुस्थानी नागरिकांना आणण्यात येत आहे. यापूर्वी अमेरिकेच्या लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथील नागरिकांना त्यांच्या मायदेशी सुखरूप पाठवले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रशांत महासागरातील रणनीती, संरक्षण सहकार्य, व्यापार यांसह विविध द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

7.25 लाख बेकायदेशीर स्थलांतरित हिंदुस्थानी

अमेरिकेत सुमारे 7 लाख 25 हजार बेकायदेशीर स्थलांतरित हिंदुस्थानी राहतात. या आकडेवारीसह हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमापंवर मेक्सिको असून येथे  41 लाख बेकायदेशीर स्थलांतरित आहेत. त्यानंतर एल साव्लाडोरचे 8 लाख, ग्वाटेमालाचे 7 लाख तर होंडुरासचे साडेपाच लाख बेकायदेशीर स्थलांतरित  राहात आहेत.

विमानात एकच शौचालय

तब्बल 205 नागरिकांना घेऊन विमान अमृतसरसाठी रवाना झाले, मात्र हे नागरिक बेकायदेशीर स्थलांतरित असले तरीही मानवतावादी दृष्टीने त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवणे हे ट्रम्प सरकारचे कर्तव्य होते. असे असताना विमानात केवळ एकच शौचालय असल्याचे समोर आले. दरम्यान, पेंटागॉन येथून लष्करी विमानाने बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशात पाठवण्यात येणार आहे. 5 हजारांहून अधिक स्थलांतरितांना अल पासो, टेक्सा आणि सॅन दियागो, पॅलिपहर्निया येथून नेण्यात येणार आहे.

ट्रम्प यांच्या आदेशानंतर इमिग्रेशन अ‍ॅण्ड कस्टम एन्फोर्समेंटने 15 लाख बेकायदेशीर स्थलांतरितांची यादी तयार केली. यात 18 हजार हिंदुस्थानींचा समावेश आहे.