Ukraine च्या अडचणीत वाढ; ट्रम्प यांनी युक्रेनला लष्करी मदत थांबवली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( US President Donald Trump ) यांनी सोमवारी युक्रेनला ( Ukraine ) लष्करी मदत थांबवली ( Pauses Military Aid To Ukraine ), अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. त्यामुळे रशियासोबत शांतता वाटाघाटी करण्यासाठी आता यु्क्रेनवर दबाव वाढला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युद्ध लवकर थांबवण्याचा प्रयत्न करणारे ट्रम्प यांच्यात झालेल्या बेबनाव नंतर आता अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे.

यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी लष्करी मदतीला विराम देण्याची शक्यता नाकारली होती. मात्र आता प्रत्यक्षात लष्करी मदत थांबवण्यात आली आहे.

‘राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे की शांतता प्रस्थापित करण्यावर ते लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे आमच्या सहकाऱ्यांनी देखील त्या ध्येयासाठी वचनबद्ध राहण्याची गरज आहे’, असं व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याचं एएफपीच्या वृत्तात म्हटलं आहे.

‘आम्ही आमची मदत थांबवत आहोत आणि यातून युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळत आहे का याचा आढावा घेत आहोत’, असं अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं.

सोमवारी ट्रम्प यांनी झेलेन्स्कीच्या आक्रमक भूमिकेला ते जास्त काळ ‘सहन करणार नाहीत’ असा इशारा दिला आणि युक्रेनच्या नेत्यानं अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी ‘अधिक कृतज्ञ’ असावं असं म्हटलं आहे.

व्हाइट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, मॉस्कोसोबत युद्धबंदी करार न झाल्यास झेलेन्स्की ‘फार काळ टिकणार नाहीत’.

न्यू यॉर्क टाईम्सने वृत्त दिलं आहे की, मदत थांबवण्याचा निर्णय तात्काळ लागू झाला असून युक्रेनला पाठवण्यात येणाऱ्या कोट्यवधी डॉलर्सच्या शस्त्रसाठ्यावर त्याचा परिणाम होईल.

झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं की ते देखील युद्ध ‘लवकरात लवकर’ संपवण्याची मागणी करत आहेत.