ट्रम्प यांचे चीनला दणक्यांवर दणके; टॅरिफ वाढवून 145 टक्के केले, व्यापार संघर्ष अधिक तीव्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांसाठी टॅरिफ धोरणाला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. तर चीनला ट्रम्प यांनी दणक्यांवर दणके दिले आहेत. चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर 84 टक्के टॅरिफ लादला होता. चीनने हे शुल्क मागे घेतले नाही, तर अमेरिका चीनवर 50 टक्के अधिक टॅरिफ लावेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी ट्रम्प यांनी इतर देशांवरील टॅरिफला 90 दिवसांपर्यंत स्थगिती दिली. तर चीनवर 125 टक्के टॅरिफ लादला. आता तो 145 टक्के करण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. त्यामुळे अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध अधिक तीव्र होणार आहे.

ट्रम्प यांनी चीनवगळता इतर देशांसाठी टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे, असे व्हाईट हाऊसच्या आदेशात म्हटले आहे. मात्र, त्यांनी चिनी आयातीवर टॅरिफमध्ये आणखी वाढ केली आहे. त्यांनी बुधवारी चीनवर 125 टक्के टॅरिफ लावला होता. तसेच तो तात्काळा लागू करण्याचे आदेश दिले होते. आता त्यात टॅरिफ 145 टक्क्यांपर्यंत वाढवला असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात अस्वस्थता आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सोमवारी अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार भूईसापाट झाले होते. तर गुरुवारी चीनचे चलन युआन 18 वर्षांच्या निचांकी पातळीवर आले आहे. तसेच सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका देत चीनवरील टॅरिफ 145 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.