
अमेरिकेतील ट्रम्प सरकार 9 हजार 500 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ट्रम्प यांचे सल्लागार आणि डॉजचे एलन मस्क यांनी संघीय कर्मचारी म्हणजेच सरकारी कर्मचारी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील सरकारी जमिनींची देखरेख करणारे आणि माजी सैनिकांना आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
या कपातीमुळे गृह, ऊर्जा, कृषी, आरोग्य व मानव सेवा यासह अनेक विभाग प्रभावित होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विभागप्रमुखांना संघीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे निर्देश देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकन सरकार सध्या कर्जात बुडाले आहे.
कर्मचारी कपात सुरूच
वेटरन्स अफेयर्स विभागाने दोन वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या लोकांसाठी 10 हजारांहून अधिक नोकऱ्या कपातीची घोषणा केली. नागरी सेवा संरक्षण नसलेल्या सुरुवातीच्या नियुक्त्यांना लक्ष्य केल्यामुळे मिशिगन ते फ्लोरिडापर्यंतच्या कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला आहे. काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा स्वीकारला नसला तरी त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.