अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात, अ‍ॅसिड टँकर आणि ट्रकच्या धडकेत एक ठार

अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. अ‍ॅसिड टँकर आणि आईल नेणाऱ्या ट्रकची टक्कर होऊन ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. जखमी क्लिनरला नडियाद सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर नडियादजवळ अ‍ॅसिडच्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग चक्काचूर झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हायड्रॉलिक स्पीडर कटर मशीनच्या मदतीने क्लिनरला बाहेर काढण्यात आले. ट्रकच्या धडकेनंतर टँकरमधून अ‍ॅसिडची गळती सुरू झाली. अग्नीशमन दलाने अ‍ॅसिडची गळती थांबवण्यासाठी अ‍ॅसिड डायल्यूट करण्यास सुरू केले. सुमारे तासाभराच्या अथक परिश्रमानंतर टँकरमधून होणारी ॲसिडची गळती थांबवण्यात आली.